➤ संकलित मूल्यमापन चाचणी-१ वेळापत्रक (कालावधी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४)
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
➤ संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. संकलित मूल्यमापन चाचणी १ करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.
३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
४. संकलित मूल्यमापन चाचणी-१ च्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.
७. चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गड्ढे मोजूनच गड्ढे / प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.
आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८. चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
९. तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी१ आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
११. शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे संभाव्य दि. १ ऑक्टोबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.
१२. संकलित चाचणी-१ कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
१४. प्रस्तुत संकलित चाचणी-१ बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्याना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात.
१६. संकलित चाचणी १ ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.
१७. संकलित चाचणी १ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
➤ • चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) संकलित चाचणी-१ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची Randomly तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.